विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होणार
Budget session : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवार (ता. 26) पासून मुंबईत सुरु होत आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय आमदारांना सरकारने चहापानाला बोलावले होते. मात्र सध्याचे सरकार हे फसवे आणि खोटारडे असल्याचा आरोप करीत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.
26 फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत हे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकार आणखी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीच्या आधी हे अखेरच्या अधिवेशन असणार आहे. त्यामुळे राज्य सरकार जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच लोकसभा निवडणुका तोंडावर असताना या अधिवेशनात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करतील. अधिवेशनानंतर लगेचच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने, राज्य सरकार जास्तीत जास्त कामकाज करण्याचा प्रयत्न करेल.