खुशखबर…विद्यार्थ्यांना एसटीची पास आता शाळा व महाविद्यालयातच मिळणार !
जळगाव टुडे । ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी शहरातील शाळा तसेच महाविद्यालयात एसटीच्या बसने जातात. मात्र, त्यासाठी त्यांना सवलतीची पास काढावी लागते आणि पास काढण्यासाठी रांगेत उभे देखील राहावे लागते. ही स्थिती लक्षात घेता शासनाने एसटीच्या पासेस आता थेट शाळा व महाविद्यालयांमध्येच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मोठा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना होऊ शकणार आहे. ( Breakinhg News )
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयांपर्यंत जाण्यास मदत करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पासेसमध्ये सुमारे 66 टक्के इतकी सवलत दिली जाते. विद्यार्थ्यांना फक्त 33 टक्के रक्कम पासेससाठी मोजावी लागते. याशिवाय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना एसटीच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येतो. मात्र, शाळेचा अभ्यासक्रम सांभाळून संबंधित सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना पासेसाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी, त्यांच्या शाळेच्या तासिकांवर सुद्धा परिणाम होतो. त्यामुळे पासेस धारक विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने शाळा व महाविद्यालयातच पासेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, येत्या 18 जूनपासून ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.