Breaking News : जामनेर तालुक्यात वाघूर नदीने धोक्याची पातळी ओलांडली; जिल्हाधिकाऱ्यांची बाधित गावांना भेट !
Breaking News : अजिंठा पर्वतरांगांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे वाघूर नदीला मोठा पूर आला असून, जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील चार गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे. बाधित गावांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच प्रशासनाला मदतकार्याची गती वाढविण्याच्या सूचना केल्या.
Breaking News : Waghur river crosses danger level in Jamner taluka; District Collector’s visit to the affected villages!
दरम्यान, वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. पुराच्या पाण्याने जीवितहानी वा पशुधनाची हानी झालेली नाही. मात्र वित्तहानी झालेली आहे. बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करणेत येत आहे. मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) ही मागविणेत आलेले आहे. त्यांच्याद्वारे आवश्यक मदतकार्य करणेत येत आहे. तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इ. ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक (SDRF) नियुक्त करण्यात आलेले आहे.
याशिवाय तापी नदीवरील हतनूर धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून, 99941 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तापी व वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्र परिसरात जावु नये तसेच पशुधन ही नेऊ नये. आपातकालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्र. 02572217193 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.