Breaking News : पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणातील पुतळा कोसळला…!
Breaking News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये समुद्र किनारी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अवघ्या ८ महिन्यांतच कोसळल्याची बातमी शिवप्रेमींसाठी धक्कादायक ठरली आहे. या पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात झाले होते. मात्र, सोमवारी (ता.२६) दुपारी हा पुतळा अचानक कोसळला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.
Breaking News : The statue of Chhatrapati Shivaji Maharaj unveiled by the Prime Minister in Konkan collapsed…!
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला हा पुतळा एक महत्त्वपूर्ण स्मारक होते. पुतळ्याच्या उभारणीसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च करून त्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच या पुतळ्याचा असा दुर्दैवी अंत होणे हे प्रशासन पर्यायाने महायुतीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा आदर राखण्याची जबाबदारी असणाऱ्या यंत्रणांनी पुतळ्याच्या उभारणीच्या कामातील त्रुटींचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
विरोधी पक्षांकडून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 43 फूट उंचीचा भव्य पुतळा जमिनीपासून 15 फूट चबुतऱ्यावर उभारण्यात आला होता, ज्यावर 28 फूट उंचीचा पुतळा उभा होता. मात्र, हा पुतळा अचानक कोसळण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या या घटनेमुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ४०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या राजकोट किल्ल्याचा एक दगडही आजपर्यंत हललेला नाही, पण केवळ सहा-सात महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला, यावरून पुतळ्याच्या उभारणीसाठी वापरलेल्या सामग्रीच्या दर्जाबाबत आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधकांनी या घटनेला अत्यंत गंभीरपणे घेतले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महाराजांचा पुतळा कोसळण्याचे कारण शोधून दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अन्यथा या प्रकरणी जिल्हाभर नव्हे तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असाही इशारा विरोधकांनी दिला आहे.