Breaking News : धुळे जिल्ह्यात शरद पवार भाजपला देणार मोठा धक्का; अमरिश पटेल राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?
Breaking News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या धुळे जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान भाजपचे आमदार अमरिश पटेल हे त्यांच्या स्वागताला हजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शरद पवार शिरपूर विमानतळावर उतरले असताना अमरिश पटेल त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. आमदार पटेल यांच्या या अनपेक्षित उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे धुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपला आगामी काळात मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Breaking News : Sharad Pawar will give a big blow to BJP in Dhule district; Will Amrish Patel join NCP?
विमानतळावरील स्वागतावेळी शरद पवारांनी मिश्किलपणे, “तुम्ही तर दुसऱ्या पक्षाचे आहात” असे म्हणत अमरिश पटेल यांना सवाल केला. ज्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. अमरिश पटेल यांच्या या कृतीमुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत, ज्याने राजकीय चर्चांना जोर आला आहे. दरम्यान, पटेल परिवाराचे आणि शरद पवारांचे खूप जुने कौटुंबिक संबंध आहेत. यात कोणतेही राजकारण नाही, असे स्पष्टीकरण स्वतः आमदार अमरिश पटेल यांनी दिले आहे.
धुळे जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत
कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सन २०१९ मधील निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमधील गावित कुटुंब आणि शिरपूरचे अमरिश पटेल यांनी काँग्रेस सोडून भाजपची साथ धरली होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरिश पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने धुळे जिल्ह्यात नव्या राजकीय हालचालींना सुरुवात झाल्याची चर्चा आता रंगली आहे. अमरिश पटेल यांच्या या भेटीमुळे धुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त होत असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अमरिश पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. या घटनेनंतर धुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.