Breaking News : म्हसावदचे प्राथमिक आरोग्य केंद्रच सलाईनवर; ग्रामपंचायतीच्या वाचनालयात तात्पुरते स्थलांतर…!

परिसरातील २६ गावांमधील ग्रामस्थांची गैरसोय

Breaking News : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील म्हसावदसारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे गेल्या काही दिवसांपासून खूपच हाल झाले आहे. स्वतःची जुनी वास्तू जीर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक वाचनालयात तात्पुरते स्थलांतर करण्याची वेळ आता या केंद्रावर आली असून, परिसरातील सुमारे २६ गावांमधील ग्रामस्थांची त्यामुळे खूपच गैरसोय होताना दिसत आहे. याबद्दल तीव्र नाराजी देखील व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी मात्र डोळ्यांवर कातडे पांघरूण घेतले आहे.

Breaking News : Primary health center of Mhasavad on saline; Shifting to Gram Panchayat Library…!

ग्रामीण भागाला चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सन १९८७ मध्ये म्हसावद येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू उभारली होती. दुर्दैवाने नंतरच्या काळात देखभाल व दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अवघ्या ३७ वर्षांच्या कालावधीतच सदर आरोग्य केंद्राची वास्तू जीर्ण होऊन बिनकामाची ठरली. त्याविषयी वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही कोणतीच हालचाल न झाल्याने जीर्णावस्थेतील धोकादायक इमारतीतच आरोग्य केंद्र चालविण्याची वेळ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपली. पावसाळ्याच्या दिवसात होणारी गळती थांबविण्यासाठी प्रसंगी स्वखर्चाने ताडपत्री टाकण्याची कसरत देखील संबंधितांना अनेक वर्षे करावी लागली.

सार्वजनिक वाचनालयाच्या वास्तुत सध्या रूग्णांवर केले जात आहेत उपचार

जीर्ण इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्र चालविणे जास्तच जोखमीचे ठरल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने म्हसावद ग्रामपंचायतीकडे तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीने नुकतीच बांधलेली लमांजन रस्त्यालगतची डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाची वास्तू उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याठिकाणी नियमित ओपीडी चालविण्यासह औषधींचा साठा करण्याकरीता आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. स्थानिक व परिसरातील रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर त्यांना व्यवस्थित बसण्याचीही सोय तिथे राहिलेली नाही.

बाळंतपणासह कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया देखील बंदच

म्हसावदचे प्राथमिक आरोग्य केंद्र सार्वजनिक वाचनालयात स्थलांतरीत करून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र, त्यामुळे आरोग्य केंद्रातील बाळंतपणासह कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया आता पूर्णपणे थांबल्या आहेत. परिसरातील २६ गावांना त्यामुळे गैरसोयींचा मोठा सामना करावा लागत आहे. गावातील आरोग्य केंद्रात असलेल्या शस्त्रक्रियांची सुविधा बंद झाल्यानंतर अनेकांना त्यासाठी रात्री-अपरात्री जळगाव शहरातील रूग्णालयात जावे लागले आहे. याविषयी विचारणा केल्यानंतर गरज पडल्यास आम्ही संबंधित महिला रूग्णांना रूग्णवाहिकांमधून शिरसोलीच्या उपकेंद्रात पाठवतो, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश अग्रवाल यांनी दिली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button