Breaking News : आमदार एकनाथराव खडसे पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतणार…?
Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये घरवापसी करण्याची तयारी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केली होती. मात्र, काही ना काही कारणांवरून त्यांचा भाजप प्रवेश लांबत गेला. चार महिने उलटले तरी भाजपकडून प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर अखेर आमदार खडसे यांनी पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत परतण्याचा विचार असल्याचे बोलून दाखवले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ देखील उडाली आहे.
Breaking News : MLA Eknathrao Khadse will return to NCP party again…?
रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना निवडून आणण्याच्या अटीवर एकनाथ खडसे यांचा भाजपमधील पक्ष प्रवेश रखडविण्यात आल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. प्रत्यक्षात रक्षा खडसे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या आणि केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री देखील झाल्या. मात्र, एकनाथराव खडसे यांचा वनवास काही संपला नाही.
खडसेंच्या भाजपमधील घरवापसीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन या दोघांचा कडाडून विरोध असल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीला चार महिने उलटले तरी खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश न झाल्याने त्यात तथ्य असल्याचे आता सिद्धच झाले आहे. त्यामुळे खडसेंनीही जास्त वेळ व घालवता भाजपचा नाद सोडून पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतण्याचा आपला विचार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामाध्यमातून भाजपला निर्वाणीचा इशारा देण्याचा कदाचित त्यांचा उद्देश सुद्धा असावा.
नेमके काय म्हणाले आमदार एकनाथराव खडसे ?
“भारतीय जनता पक्षात आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती आपण भाजप पक्षश्रेष्टींकडे केली होती. मात्र, भाजपाकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी माझा राजीनामा स्विकारण्यास नकार दिला आहे. मी भाजपाकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. भाजपामध्ये जाण्याची माझी इच्छा होती. माझ्या काही अडचणी होत्या, त्या मी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही सांगितल्या होत्या. मात्र, भाजपाकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे मला आता माझ्या राजकीय भवितव्याचा विचार करावा लागेल. भाजपमध्ये जे.पी.नड्डा यांच्या उपस्थित माझा भाजपा प्रवेश करण्यात आला होता. मात्र त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. अशा परिस्थितीत आता भाजपामध्ये राहणे योग्य नाही,” असे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.