Breaking News : म्हसावदचे ग्रामीण रूग्णालय सहा वर्षांपासून कागदावरच; प्राथमिक आरोग्य केंद्रही वाऱ्यावर…!
विधानसभेच्या निवडणुकीत पडसाद पडण्याची चिन्हे
Breaking News : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील मोठ्या लोकवस्तीच्या म्हसावद गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय शासनाने मागे घेतला होता. प्रत्यक्षात गेल्या सहा वर्षांपासून म्हसावदचे प्रस्तावित ग्रामीण रूग्णालय कागदावरच असून, तिथे सध्या असलेले प्राथमिक आरोग्य केंद्रही शासनाने वाऱ्यावर सोडून दिले आहे. लोकप्रतिनिधींनीही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.
Breaking News : Mhasavad’s rural hospital remains on paper for 6 years; Primary health center also in the wind…!
जळगाव जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना भेडसावणाऱ्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालिन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी २० डिसेंबर २०१७ रोजी नागपूर अधिवेशनादरम्यान तत्कालिन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या संबंधित विभागाच्या आढावा बैठकीत म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन त्याठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्याबाबतचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता. त्यानुसार परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांमार्फत आरोग्य संचालक व प्रधान सचिवांकडे सादर केला होता. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने २२ मार्च २०१८ रोजी म्हसावदच्या आरोग्य केंद्राचे ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा जारी केला होता.
ग्रामीण रूग्णालय झालेच नाही, आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस
म्हसावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून तिथे ३० खाटांचे ग्रामीण रूग्णालय मंजूर झाल्यानंतर आवश्यक बांधकाम, पद निर्मितीच्या कार्यवाहीला चालना मिळण्याची अपेक्षा होती. दुर्दैवाने विशेष बाब म्हणून मान्यता मिळालेल्या प्रस्तावित ग्रामीण रूग्णालयाकडे शासनाने नंतरच्या कालावधीत ढुंकुनही पाहिले नाही. शासन निर्णयाला अक्षरशः केराची टोपली दाखविण्यात आली. ज्यांनी म्हसावदच्या ग्रामीण रूग्णालयासाठी प्रयत्न केले होते, त्या मंत्र्यांनीही नंतरच्या काळात त्यासाठी विशेष पाठपुरावा केला नाही. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या देखभाल व दुरूस्तीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. परिणाम असा झाला की म्हसावदला ग्रामीण रूग्णालय झालेच नाही, प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत देखील मोडकळीस आली. आताच्या घडीला म्हसावदचे आरोग्य केंद्र ग्रामपंचायतीच्या वाचनालयात तात्पुरते स्थलांरीत करण्यात आले असून, त्याठिकाणी रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकाराबद्दल परिसरातून तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.