Breaking News : “महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही”
महाविकास आघाडीचा महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल…!
Breaking News : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा पुतळा कोसळण्यावरून महायुतीच्या सरकारवर निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शरद पवार, छत्रपती शाहू महाराज यांच्यासह नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही,” असेही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.
Breaking News : Mahavikas Aghadi Jode Maro Movement; A strong attack on the Mahayuti government…!
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज रविवारी (ता.०१) मुंबईत महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन पुकारले. त्यानिमित्त बोलताना उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार तसेच छत्रपती शाहू महाराज, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर प्रखर टीका करून जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, खासदार शरद पवार म्हणाले की, “वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचे सांगितले जात आहे. गेटवेवर महाराजांचा पुतळा सुमारे ५० वर्षांपासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. राज्यातही असे अनेक पुतळे आहेत. मालवणमधील पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळेच सदरचा पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे.”
बघा कोण काय म्हणाले…?
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकी माफी कशासाठी मागितली? पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? की भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी मागितली,” अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. छत्रपती शाहू महाराज म्हणाले की, “या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. शिवरायाचा मान आपण सर्वांनी राखायला हवा.” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचे काम सरकारने केले.”