Breaking News : मंत्री गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात त्यांचाच विश्वासू सहकारी फुंकणार आता राष्ट्रवादीची तुतारी….!
Breaking News : विधानसभेच्या जामनेर मतदारसंघात आपल्या विरोधात आता कोणीच विरोधक शिल्लक राहिलेला नाही, असा दावा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. प्रत्यक्षात त्यांच्याच एका जुन्या विश्वासू सहकाऱ्याने त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार आव्हान देण्याची तयारी आता चालवली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकून मंत्री महाजनांना आव्हान देणारा तो नेता भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Breaking News : In the stronghold of Minister Girish Mahajan, his trusted colleague will blow the NCP’s trumpet….!
जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना, भाजपचा राजीनामा देऊन जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आपण इतकी वर्षे भाजपचे इमाने इतबारे काम केले, पण पूर्वीचा भारतीय जनता पक्ष आणि आताचा भारतीय जनता पक्ष यात खूपच फरक आहे. मंत्री गिरीश महाजन आमचे नेते असले तरी त्यांच्याकडे जाऊन कामे मागण्याची देखील सोय आता राहिलेली नाही. त्यांची भेट होणे देखील मुश्किल झाले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भाजपचा राजीनामा देत आहोत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी आपल्या संपर्कात आहेत, अशी प्रतिक्रिया खुद्द दिलीप खोडपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देणे, वैयक्तिक मंत्री गिरीश महाजनांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दिलीप खोडपे यांचा शनिवारी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश शक्य
येत्या शनिवारी (ता.२१ सप्टेंबर) शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा जामनेर मतदारसंघात येत आहे. त्याचवेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जामनेर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे दिलीप खोडपे यांच्या पक्ष प्रवेशासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत.