Breaking News : उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसामुळे हाहाकार; पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेले…!

Breaking News : उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हाहाकार माजला आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना मोठे पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती आणखी गंभीर झाली असून, पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेले आहेत.

Breaking News : Havoc due to heavy rains in North Maharashtra; Three people were washed away in the flood water…!

दुर्दैवी घटनेतील बळींमध्ये बर्डी आश्रमशाळेत रोजंदारीवर कार्यरत असलेले शिक्षक तसेच दोन अन्य व्यक्तींचा समावेश आहे. या तीन व्यक्तींमधील दोघांचे मृतदेह शोधकार्यादरम्यान हाती लागले आहेत. मात्र, एक व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पुरामुळे अनेक भागांत वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नद्या ओसंडून वाहत असल्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. सोमवारी दुपारी २ वाजता धरणाचे सर्व १६ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून, यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. धरणाच्या या दरवाजांतून ६०,८८३ क्युसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरण देखील सध्या भरून जाण्याच्या स्थितीत आहे आणि पुढील दोन दिवसांत हे धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यास गिरणा नदीकाठच्या भागांतही पूर येऊ शकतो.

सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या

दरम्यान, मुसळधार पावसामुळे नवापूर शहरातील रंगावली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागांत लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहने या खड्ड्यांमध्ये अडकली असून, यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button