Breaking News : पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टेंशन; जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटात उभी फूट…?
Breaking News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत नाही तेवढ्यातच जळगाव ग्रामीण मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना शिंदे गटाच्या नाकात दम आणला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गावांमधील तरूणांनी पक्ष प्रवेशासाठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात उभी फूट पडल्याचे बोलले जात असून, स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्याबद्दल जाहीरपणे चिंता व्यक्त केली आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
Breaking News : Guardian Minister Gulabrao Patal is in tension; In Jalgaon Rural Shiv Sena Shinde faction stand split…?
विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्यानंतर जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीसह महायुतीने पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील संवाद वाढविण्यासाठी अलिकडे मतदारसंघनिहाय मेळाव्यांच्या आयोजनावर भर दिलेला आहे. विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाकडून मेळावांचा धडाका लावण्यात आला आहे. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यातील संभाव्य लढतीमुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष सुद्धा वेधले गेले आहे.
नेमके काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील ?
दरम्यान, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गटातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात धरणगाव तालुक्यासाठी नुकतेच एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी बोलताना मंत्री पाटील यांनी वेगळीच चिंता व्यक्त केली. “आपण स्वतः पाच आमदारक्या लढलो आहेत आणि दोन आमदारक्या दुसऱ्याच्या लढलो आहे. त्यामुळे माणूस, गल्ली, वाडा, गटार सर्वकाही आपण जवळून पाहिले आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जवळपास ७० टक्के गावांमध्ये आजच्या घडीला शिंदे सेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. तुमच्या गटामुळे माझे नुकसान होईल, अशी स्थिती काही ठिकाणी आहे. पण लक्षात ठेवा एका गटवाल्याने दुसऱ्या गटाची लफडी केली आणि उद्याच्या दिवशी त्याने माझ्याऐवजी दुसऱ्या माणसाला मदत केली, तर समोरच्याला काहीच फरक पडणार नाही. तो तुम्हाला मानणार पण नाही. तो म्हणेल मी माझ्या ताकदीवर निवडून आलो. पण लक्षात ठेवा तुम्ही जर त्याला गूपचूप मदत केली, तर गुलाबराव पाटलाच्या घरी पहिले फटाके फुटणार नाहीत. पहिले तुमच्या घरासमोर फटाके फुटतील, याचा विचार करा,” असे मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.