चार शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून शेताच्या बांधावर झाला दुर्दैवी मृत्यू…!
Breaking News : शेतात पडलेल्या वीजवाहक तारांचा स्पर्श झाल्यामुळे चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गणेशपूर (मेंडकी) येथे बुधवारी सकाळी घडली. सदरची घटना नेमकी कशी घडली याबाबत तपास सुरू असून, शेताच्या कुंपणात रानडुक्करांचा बंदोबस्त करण्यासाठी वीजवाहक तारा सोडल्या होत्या का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Breaking News : Four farmers unfortunately died due to electric shock on the farm embankment…!
शेतकऱ्यांच्या मृत्यु मागे संबंधित क्षेत्रातील वीज वितरण कंपनीचाही दोष आहे का, हे पाहण्यासाठी तांत्रिक पथक पाठवण्यात आले आहे. या अपघातामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता शेतात काम करत असताना शेतकऱ्यांचा स्पर्श अचानक वीजवाहक तारांना झाला. ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत बळी गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे आणि नानाजी राऊत यांचा समावेश आहे. त्यापैकी तीन शेतकरी गणेशपूरचे रहिवासी असून, एक शेतकरी चिचखेडचा आहे.
दोन्ही जखमी शेतकऱ्यांची तब्बेत चिंताजनक, उपचार सुरू
अन्य दोन शेतकरी विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचीही तब्बेत चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली असून, पोलिस व वीज वितरण विभागाने घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली आहे. या अपघाताच्या कारणांची कसून तपासणी सुरू असून, रानडुक्करांना आळा घालण्यासाठी वीज तारांचा वापर केला गेला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.