Breaking News : मोठी बातमी; मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागे ‘हे’ होते कारण…!
Breaking News : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला १६ पानी अहवाल सरकारकडे सादर केला आहे. या अहवालात छत्रपतींचा पुतळा कोसळण्यामागील कारणे स्पष्ट करण्यात आली आहे. पुतळ्याची फ्रेम कमकुवत असल्याने आणि पुतळ्यात गंज चढल्याने तो कोसळल्याचा प्रमुख निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे.
Breaking News : Big news; ‘This’ was behind the collapse of Chhatrapati Shivaji Maharaj’s statue in Malvan because…!
सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली होती आणि ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. समितीच्या तपासात समोर आले की, पुतळ्याच्या लोखंडी फ्रेममध्ये गंज मोठ्या प्रमाणात वाढल्याने ती कमजोर झाली होती, ज्यामुळे पुतळा कोसळला. चौकशी समितीच्या अहवालामुळे छत्रपतींचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमांडर पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगीड, प्रा.परिदा यांचा समावेश होता.
पुतळ्याच्या देखभालीतही हलगर्जीपणा झाल्याचे आले समोर
चौकशी समितीच्या अहवालानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची योग्य देखरेख न होणे आणि वेळोवेळी आवश्यक दुरुस्ती न करणे हे देखील कोसळण्याचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालात पुतळा कोसळण्याचे कारण पुतळ्याच्या फ्रेमची कमजोरी, गंज आणि चुकीच्या वेल्डिंग कामाला दोषी ठरवण्यात आले आहे. समितीच्या तपासात स्पष्ट झाले आहे की, पुतळा उभारलेले फ्रेमवर्क पाहिजे तसे मजबूत नव्हते, ज्यामुळे त्यात कमकुवतपणा आला. शिवाय, पुतळ्याच्या देखभालीतही हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. फ्रेमवर गंज लागल्यामुळे पुतळ्याला आणखी हानी पोहोचली होती. याच कारणांमुळे पुतळा कोसळल्याचे अहवालात नमूद केले आहे.