Breaking News : भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीला लागले गालबोट; दगडफेक करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज…!
Breaking News : राज्यभर गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये शांतता कायम असताना, भिवंडीतील घुंघटनगर येथे एक मोठी अनुचित घटना घडली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेशमूर्ती विसर्जनासाठी कामवारी नदीकडे गणेश भक्त घेऊन जात होते, तितक्यात अचानक काही अज्ञात व्यक्तींनी मूर्तीवर दगडफेक केली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता घडला, ज्यामुळे विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले.
Breaking News : Bhiwandi Ganesh Visarjan Procession In Bhiwandi; Police baton charge on stone pelters…!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील दगडफेकीमुळे गणेशमूर्ती काही ठिकाणी भंग पावली. त्यामुळे मंडळाने विसर्जन मिरवणूक थांबवली आणि परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणावर तणाव कायम होता, मात्र पोलीस प्रशासनाने शांतता राखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून “जय श्रीराम”च्या घोषणा
घुंघटनगर येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पोलिसांनी हस्तक्षेप करीत लाठीचार्ज केला. मात्र, रात्री २.३० वाजेपर्यंत मिरवणूक पुढे जाऊ शकली नाही. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे. घटनास्थळी भाजप आमदार महेश चौघुले यांनी भेट दिली. यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सध्या पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.