एकनाथ खडसेंना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी !
मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल
Breaking News : भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दाऊदने काही वर्षांपूर्वी फोनवरून धमकी दिल्याचे आणि दाऊदच्या पत्नीशी त्यांचे संभाषण झाल्याच्या आरोपाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगने जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडसेंच्या फियार्यादीवरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना 15 ते 16 एप्रिलच्या कालावधीत चार वेगवेगळ्या मोबाईलवरून धमकीचे फोन करण्यात आले. मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीने “हम दाऊद इब्राहिम कासर के आदमी है…मार डाला, अब तुम छोटा शकील को मार डालो. नहीं तो तुम्हारी खैर नहीं,” अशी धमकी त्यांनी एकनाथ खडसे यांना दिली. त्यानंतर खडसेंनी त्यांना विचारले की “तुम जो ये दाऊद और शकील का नाम ले रहे हो, ये कोण है? मै पहचाता नही.” त्यावरून समोरच्या व्यक्तीने “दाऊद और शकील ये अंडरवर्ल्ड डॉन है और तुमको मार देंगे,” असे बोलून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मोबाईलवरून धमकी देणाऱ्या चारही अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप दुनगहू करीत आहेत. खडसेंना आलेले फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.