Breaking News : कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून खाक !
Breaking News : कोल्हापुरातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले, ज्यामुळे संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. तथापि, आगीच्या तीव्रतेमुळे नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे.
Breaking News : Historic Keshavrao Bhosle theater in Kolhapur city gutted in fire !
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मागच्या बाजूस असलेल्या खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आगीने खासबाग मैदानाचा स्टेज आणि त्याला लागून असलेले थिएटर संपूर्णपणे जळून खाक केले. थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडी बांधकाम असल्याने आग अत्यंत वेगाने पसरली आणि रौद्ररूप धारण केले. आग लागल्याची माहिती मिळताच, तातडीने अग्निशमन विभागाला कळविण्यात आले आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
नाट्यगृहात शनिवारी आणि रविवारी होते कार्यक्रमांचे आयोजन
राजर्षी शाहू महाराज यांच्या पुढाकाराने उभारलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापुरातील ऐतिहासिक वास्तू आहे. १९१३ ते १९१५ या काळात बांधले गेलेले हे नाट्यगृह त्याच्या अनोख्या वास्तुशिल्पामुळे ओळखले जाते. रंगमंच २० फूट बाय ३४ फूट इतका प्रशस्त असून, प्रेक्षकांना रंगमंच पाहताना अडथळा ठरेल असा एकही खांब या नाट्यगृहात नाही, हे या ठिकाणाचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. याच ऐतिहासिक नाट्यगृहात अनेक नामवंत नाटकांचे प्रयोग झाले आहेत. विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन याच ठिकाणी करण्यात आले होते.