Breaking News : उनपदेवच्या गरम पाण्यावर होणार वीज निर्मिती; ‘ओएनजीसी’ सुरू करणार प्रकल्प !
Breaking News : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या उनपदेव येथे बाराही महिने वाहणारा गरम पाण्याचा झरा दिसून येतो. याशिवाय परिसरातील ट्यूबवेल्समध्येही गरम पाणी आढळते. याच ठिकाणच्या गरम पाण्याचा उपयोग करून तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन अर्थात ‘ओएनजीसी’ भू औष्णिक वीज निर्मितीचे काम हाती घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. सदरच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
Breaking News : Electricity will be generated on the hot water of Unpadev; ‘ONGC’ will start the project!
१४ वर्षांचा वनवास भोगत असताना प्रभू श्री रामचंद्र उनपदेव येथे आल्यानंतर त्वचा रोगाने पीडित महर्षि शरभंग ऋषींसाठी त्यांनी जमिनीत बाण मारून गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली होती. त्यातून निघालेल्या गरम पाण्याने अंघोळ करून नंतर शरभंग ऋषींना पूर्ववत दिव्य शरीर रूप प्राप्त झाले होते, अशी आख्यायिका पूर्वापार प्रसिद्ध आहे. दुसरीकडे सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये अस्तित्वात असलेल्या गंधकाच्या साठ्यातून या गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती झाली आहे आणि त्यामुळेच याभागातील भूगर्भात असलेले पाणी कायम उष्ण असते, असे शास्त्रीय कारण सांगितले जाते. गंधक हे त्वचा रोगावरील उपचारासाठी उपयुक्त असल्याने त्वचारोग दुरूस्त करण्यासाठी नागरीक हे पाणी घेऊन जातात, असे सुद्धा शास्त्रज्ञांचे मत आहे.
उनपदेवच्या गरम पाण्यावरही होऊ शकते भू-औष्णिक वीज निर्मिती
प्राप्त माहितीनुसार, देशात सुमारे ३४० ठिकाणी अस्तित्वात असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्यांचे भूगर्भीय सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात उनपदेव परिसराचाही समावेश होता. अभ्यासातून सध्याच्या घडीला देशात सहा ठिकाणी भू-औष्णिक वीज निर्मितीला चालना देखील मिळाली आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या उनपदेवच्या गरम पाण्यावरही भू-औष्णिक वीज निर्मिती होऊ शकते, असा निष्कर्ष निघाला आहे. त्यानुसार तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशन अर्थात ‘ओएनजीसी’ने जळगाव जिल्ह्याच्या उनपदेव परिसरात वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग दिल्याचे समजले आहे. लडाखमध्ये सध्या प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पानंतर जळगाव जिल्ह्यातील वीज निर्मिती प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.
भू-औष्णिक उर्जेपासून वीज निर्मितीसाठी करण्यात आलाय सामंजस्य करार
ओएनजीसी एनर्जी सेंटरद्वारे (ओईसी) लडाख या केंद्र शासित प्रदेश आणि लेह लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्यासोबत ६ फेब्रुवारी रोजी सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. त्यातून ओएनजीसीचा हा प्रकल्प भारताला जगाच्या भू-औष्णिक उर्जेच्या नकाशावर आणण्याचे काम करत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाने महाराष्ट्रातही भू-औष्णिक उर्जेपासून वीज निर्मितीच्या विकासासाठी आणि अंमलबजावणीसाठी एम एस थरमॅक्स लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. त्यामाध्यमातूनच जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी भू-औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे.