Breaking News : ७.५ एचपीपर्यंत कृषीपंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना ५ वर्षे मिळणार मोफत वीज !
Breaking News : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत ७.५ एचपीपर्यंत कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना आता सरसकट मोफत वीज मिळणार आहे. असे राज्यात सुमारे ४४ लाख ३ हजार शेतकरी आहेत, ज्यांना पुढच्या ५ वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे. या मोफत वीज योजनेची अंमलबजावणी एप्रिल २०२४ पासून होणार असून, विशेष म्हणजे शेतकऱ्यांना मागच्या तीन महिन्यांचे बिल भरावे लागणार नाही.
Breaking News : Farmers using agricultural pumps up to 7.5 HP will get free electricity for 5 years
शेती सिंचनासाठी ७.५ एचपीपर्यंत कृषी पंप वापरतात त्याच शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल. म्हणजेच ७.५ एचपीपेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. मात्र, ७.५ एचपीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे वीज बील भरावे लागेल. ७.५ एचपीपेक्षा जास्त क्षमतेचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेचा अजिबात लाभ मिळणार नाही.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेला पुढील ५ वर्षे म्हणजेच सन २०२९ पर्यंत मंजुरी देण्यात आली आहे. पण ३ वर्षांनंतर या योजनेचा आढावा घेऊन ती सुरु ठेवायची किंवा नाही याचा निर्णय घेतला जाईल, असेही शासन निर्णयात म्हटले आहे. तसेच ही योजना राबविण्याची जबाबदारी महावितरणची असणार आहे. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी १४ हजार ७६० कोटी रुपयांचा खर्च शासनाला येणार आहे. पण या संपूर्ण रकमेचा भार आताच सरकारवर येणार नाही. कारण सरकार आधीच कृषी पंपांना सवलतीच्या दरात वीज देत होते. त्यासाठी सरकार जवळपास ७ हजार कोटी रुपये अनुदान देत होते. त्यात आता जवळपास एवढीच रक्कम सरकारला आणखी टाकावी लागणार आहे.