केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणाऱ्या 300 रुपये सबसिडीला मार्च 2025 मुदतवाढ
Breaking News : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मिळणाऱ्या 300 रुपये सबसिडीला मार्च 2025 मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आणखी वर्षभर 12 सिलिंडरपर्यंत सदरची सबसिडी मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली.
महिलांचे संरक्षण आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांमध्ये सरपण, शेणाच्या गोवऱ्या यासारख्या गोष्टी स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरल्या जातात. त्यातून निघणारा धूर अनेक आजारांचे मूळ आहे. गरीब कुटुंबांकडे गॅस सिलिंडर घेण्यासाठीही पैसे नसतात. त्यामुळेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून ही योजना सुरू केली होती. ज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले जातात. एवढेच नाही तर महिलांनी वर्षभर फक्त एलपीजी गॅस वापरावा, यासाठीच त्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर दिले जातात. यासोबतच कनेक्शन घेतल्यावर 1600 रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते जेणेकरून ते गॅस कनेक्शनशी संबंधित इतर आवश्यक गोष्टीही खरेदी करू शकतील. गॅस स्टोव्ह खरेदी करण्यासाठी सरकार हप्त्यांची सुविधा देखील प्रदान करते. मुंबईतल्या रहिवाशांना आता 602 रुपये 50 पैशात 14 किलो वजनाचे एलपीजी सिलेंडर मिळेल.
मंत्रिमंडळाचे इतर महत्वाचे निर्णय
केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्तांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात सरकारने 4 टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे महागाई भत्ता आता 50 टक्के होईल. 01 जानेवारी 2024 पासून ही दरवाढ लागू होईल. यामुळे घरभाडे भत्त्यातही 03 टक्के वाढ होईल. तसेच इतरही लाभ या कर्मचाऱ्यांना मिळतील. याशिवाय इंडिया एआय मिशनला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याअंतर्गत देशभरात विविध केंद्र स्थापन केली जाणार आहेत. यासाठी सुमारे 10 हजार 372 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. कच्च्या ज्यूटसाठीच्या किमान आधारभूत किंमतीतही सरकारने वाढ केली आहे.