ऐकावे ते नवलच; बकरीच्या पिल्लाला चक्क माणसासारखे तोंड आणि डोळे !
जळगाव टुडे । जनुकीय बदलामुळे बऱ्याचवेळा गायी-म्हशीसारख्या प्राण्यांकडून चित्र विचित्र पिल्ले जन्माला घातली जातात. चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याकडे असलेल्या बकरीने देखील अशाच एका पिल्लास जन्म दिला आहे. विशेष म्हणजे बकरीच्या त्या पिल्लास चक्क माणसासारखी चेहरापट्टी, दाढी आणि डोळे असल्याचे दिसून आले आहे. बकरीच्या त्या पिल्लाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे. ( Breaking News )
चेकबरडी ( जि.चंद्रपूर ) येथील शेतकरी मोतीराम आत्राम यांच्याकडे काही बकऱ्या आहेत. त्यातील एका बकरीने दोन करडांना जन्म दिला. विशेष म्हणजे त्यापैकी एक करडू इतर करडांसारखे सामान्य आहे. मात्र, दुसरी भलतेच अफलातून असल्याचे आढळले आहे. त्याला अक्षरशः माणसासारखी चेहऱ्याची ठेवण, डोळे, चेहरा, दाढी हे सर्व काही माणसासारखे असल्याचे पाहुन परिसरातील नागरिकांनी शेतकरी आत्राम यांच्याकडे मोठी गर्दी केली.
दुर्दैवाने जन्मतः अशक्त व नाजूक असलेल्या बकरीच्या त्या जगावेगळ्या करडाला शेतकरी मोतीराम आत्राम जास्त वेळ वाचवू शकले नाही. त्यांनी ते गावातील मोकळ्या जागेत खड्डा खोदून गाडून टाकले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते अशी करडे जनुकीय बदलांमुळे जन्माला येऊ शकतात आणि प्राकृतिक घटकांमुळेच हे सर्व घडते. मात्र, ते पाहिल्यावर सर्वांना आश्चर्य वाटते.