मोठी बातमी…पेट्रोल आणि डिझेल २० रूपये प्रति लिटरने स्वस्त होणार ?
जळगाव टुडे । केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या म्हणजेच जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या दृष्टीने विचार करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशभरात येत्या काही दिवसातच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लिटरमागे सुमारे २० रूपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. साधारणतः ७५ रूपये लिटरप्रमाणे पेट्रोल व डिझेलची विक्री होण्याचा अंदाज आहे. ( Breaking News )
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची बैठक नवी दिल्लीत नुकतीच पार पडली. त्यात झालेल्या निर्णयानुसार, केंद्र सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यास तयार आहे. आता फक्त राज्यांनी त्यासंदर्भात निर्णय घ्यायचा बाकी आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यास संपूर्ण देशभरात दोन्ही प्रकारच्या इंधनाचे दर हे समान राहतील. सध्याच्या घडीला दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७२ रूपये प्रतिलिटर आहेत, तर देशाच्या दुसऱ्या बाजुला महाराष्ट्रात परभणीमध्ये १०७.३३ रूपये लिटर आहेत. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल विकले जाते. तिथे पेट्रोलची किंमत ८२.४२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ७८ रुपये प्रति लिटर आहे. जीएसटीच्या कक्षेत आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल कुठेही खरेदी केले तरी दरात कोणताच फरक पडणार नाही, अशी माहिती मिळाली आहे.
अशी कमी होईल पेट्रोलची किंमत
दरम्यान, देशात विकले जाणारे पेट्रोल तसेच डिझेल हे २८ टक्के जीएसटीच्या स्लॅबमध्ये ठेवल्यास त्याची मूळ किंमत वाहतुकीसह ५५.६६ रूपये असेल. त्यावर २८ टक्के जीएसटी आकारल्यास १५.५८ रूपये किंमत वाढेल. डिलरचे सरासरी कमिशन हे ३.७७ रुपये द्यावे लागेल. पेट्रोलसाठी एकूण किंमत त्यामुळे ७५.०१ रूपये प्रति लिटर एवढीच ग्राहकांना मोजावी लागेल.