विषारी दारूने केला घात…२५ मजुरांचा मृत्यू, ६० जणांची प्रकृती गंभीर !
जळगाव टुडे । विषारी दारू प्यायल्याने यापूर्वी अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानंतरही ग्रामीण भागात सर्रास लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार बिनभोबाटपणे सुरू असल्याचे दिसून येते. तमिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यातही विषारी दारू प्यायल्याने सुमारे २५ लोकांचा मृत्यू झाला असून, आणखी ६० जणांवर प्रकृती गंभीर असल्याने रूग्णालयात उपचार सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधीक्षकांसह नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ( Breaking News )
विषारी दारूमुळे मृत्युमुखी पडलेले सर्व रोजंदारीने काम करणारे मजूर आहेत. विषारी दारू प्यायल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा त्यांना बराच वेळ जुलाब, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना तातडीने कल्लाकुरीची येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच सुमारे २५ मजुरांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांचे शवविच्छेदन केले जात आहे. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतरच मजुरांच्या मृत्युचे खरे कारण समजू शकणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी विषारी दारूची विक्री करणारा कन्नूकुट्टी (वय ४९) या आरोपीला अटक केली आहे तसेच त्याच्याकडून सुमारे २०० लिटर दारू जप्त केली आहे. राज्य सरकारने संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबी-सीआयडीमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय पोलिस अधीक्षक समयसिंह मीना यांना तसेच कल्लाकुरिची जिल्ह्याच्या दारूबंदी शाखेच्या एकूण ०९ पोलिसांना निलंबित केले आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सदरच्या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. एमएस प्रशांत यांची जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आणि रजथ चतुर्वेदी यांची पोलिस अधीक्षक म्हणून तातडीने नियुक्ती करण्याचे आदेश सुद्धा काढले आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले मजूर लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.