मोठी बातमी…नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी ‘या’ नेत्याने घेतली होती सुपारी !

जळगाव टुडे । लोकसभेच्या अमरावती मतदारसंघात झालेला नवनीत राणा यांचा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागला आहे. कारण, राणा विजयी झाल्या असत्या तर कदाचित केंद्रात मंत्री देखील बनल्या असत्या आणि अमरावतीचा आणखी वेगाने विकास झाला असता. दरम्यान, नवनीत राणा यांना पराभूत करण्यामागे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही अमरावती जिल्ह्यातीलच एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचा हात होता. त्यांनी त्याची सुपारी सुद्धा घेतली होती, असा खळबळजनक आरोप आता करण्यात आला आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. ( Breaking News )

नवनीत राणा यांचा लोकसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर आमदार रवी राणा यांनी त्यांच्या मनातील खदखद प्रथमच प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली. नवनीत राणा यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव व्हावा म्हणून दुसरे तिसरे कोणी नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी सुपारी घेतली होती, असा आरोप देखील आमदार राणा यांनी केला आहे. त्यामुळे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा विकोपाला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नवनीत राणा यांचा पराभव आमच्यासाठी अतिशय धक्कादायक असून, आम्ही कुठे कमी पडलो त्याचे आत्मचिंतन करत आहोत. विकासाच्या आड आलेल्या काही स्वार्थी मंडळींनी घात केल्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्या विजयी झाल्यानंतर कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील बनल्या असत्या. त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून निघणार होता. किंबहुना अमरावतीचा विकासरथ आणखी गतीमान झाला असता, अशीही खंत आमदार रवी राणा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. दुसरीकडे बच्चू कडू यांनीही आमदार रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. राणा यांच्या आरोपात काहीच तथ्य नसून विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही त्याचे उत्तर देऊ, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button