मोठी बातमी…राज्यात घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यास स्थगिती !

जळगाव टुडे । महावितरणने खासगी कंपन्यांच्या माध्यमातून राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याची जय्यत तयारी केली होती. मात्र, स्मार्ट मीटर बसविण्यास सुरूवात होत नाही तेवढ्यातच त्यास सर्व थरातून तीव्र विरोध होऊ लागला होता. काही ठिकाणी तर मीटर बसविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच हुसकावून लावण्यात आले होते. जनतेचा वाढता रोष लक्षात घेता शेवटी शासनाला घरगुती पातळीवरील स्मार्ट मीटर बसविण्याची अंमलबजावणी थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. ( Breaking News )

मुंबईत शुक्रवारी (ता.14) भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. त्यानंतर लगेचच राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरगुती वीज ग्राहकांसाठी यापुढे स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जाणार नसल्याची घोषणा केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आज त्यास दुजोरा दिला. त्यामुळे सामान्य वीज ग्राहकांसाठी कोणतेच स्मार्ट मीटर लावले जाणार नसल्यावर शिक्कामोर्तब झाले. लोकसभेच्या निवडणुकीत मोठी हार पत्करावी लागल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत आणखी फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन बहुधा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय मागे घेतला असावा, असे बोलले जात आहे.

अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी आणि मॉन्टेकार्लो यांना मोठे कंत्राट देऊन सुमारे 02 कोटी 16 लाख घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे कार्य साधारण पुढील आठवड्यापासून हाती घेण्यात येणार होते. तत्पूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून आता नियमित वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर आणले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता सर्व मीटर्स फक्त औद्योगिक आणि मोठ्या प्रमाणात वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वापरले जाणार आहे. यापुढील काळात त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केले जाणार आहे. घरगुती आणि लहान व्यवसायांसाठी कोणत्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही. दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे वीज कर्मचाऱ्यांनी देखील सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कारण, स्मार्ट मीटरमुळे अनेकांच्या नोकरीवर देखील गंडांतर येणार होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button