रिझर्व्ह बँकेचा सरकारी बँकाना कोट्यवधींचा दंड…तिथे तुमचे बचत खाते तर नाही ?
जळगाव टुडे । बँक मग ती सरकारी असो की खासगी, आर्थिक निकषांचे व्यवस्थित पालन न केल्यास त्यांच्यावर रिझर्व्ह बँक कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय राहत नाही. बऱ्याचवेळा मोठ्या रकमेचा दंड देखील संबंधित बँकांना ठोठावला जातो. आताही रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली असून, दोन बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे. संबंधित बँकांमध्ये तुमचे बचत खाते असेल, तर तुमची चिंता वाढू शकते. आता तुमच्या पैशांचे पुढे काय होईल, असाही प्रश्न तुमच्या मनात निर्माण होऊ शकतो. ( Breaking News )
प्राप्त माहितीनुसार, देशातील कोणत्याही बँकेने नियमांचे उल्लंघन केल्यावर म्हणजे आर्थिक निकषांचे व्यवस्थित पालन न केल्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या बँकेवर कारवाई करते. संबंधित बँकेवर दंड आकारला जातो. पण बँकेवर आकारलेला दंड खातेदारांना भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही.
रिझर्व्ह बँकेने आर्थिक नियमांचे पालन केले नाही म्हणून आताही सेंट्रल बँक ऑफ इंडियाला सुमारे 1.45 कोटी रुपयांचा तसेच सोनाली बँकेला सुमारे 96.4 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पैकी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सबसिडी म्हणून सरकारकडून मिळालेल्या निधीच्या बदल्यात कॉर्पोरेशनला कर्ज दिले होते. अनाधिकृत इलेक्ट्रॉनिक व्यवहारांच्या काही प्रकरणांमध्ये समाविष्ट असलेली रक्कम ग्राहकांच्या खात्यांमध्ये निर्धारित वेळेत जमा झालीच नाही. त्यामुळे सेंट्रल बँकेला दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
अशाच प्रकारे सोनाली बँक पीएलसीला केवायसीच्या सूचना, 2016 सह काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल 96.4 लाख रुपयांचा दंड ठोठावला गेला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये नियमांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.