लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपात विलीन होणार ?

जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीच्या येत्या मंगळवारी (ता.04) लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, लोकसभेच्या निकालानंतर विशेषतः महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमध्ये खूप मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काका शरद पवारांशी बंड पुकारून वेगळा संसार थाटणाऱ्या अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस थेट भाजपात विलीन होणार असल्याच्या चर्चांना देखील ऊत आला आहे. शरद पवार गटाच्या मोठ्या नेत्यानेही त्याबद्दल मोठा दावा केला आहे. ( Breaking News)

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इच्छा असुनही बऱ्याच ठिकाणी त्यांचे उमेदवार देता आले नाही. जागा वाटपावेळी भाजप नेत्यांनी दिल्या तेवढ्या जागांवरच त्यांना समाधान मानावे लागले. त्यातही जेवढ्या काही जागा त्यांनी लढल्या त्या सर्व जागांवर आपण विजयी होऊ की नाही, याची शंका त्यांच्या मनात घर आता करून बसली आहे. सध्या पराभवाच्या छायेखाली वावरत असलेल्या अजित पवार गटातील बऱ्याच आमदारांना त्यामुळे त्यांच्या भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे. शरद पवारांची साथ आता पुन्हा मिळणार नाही आणि अजित पवारांसोबत राहुन विधानसभा निवडणुकीत आपला काही ठिकाणा लागणार नाही, अशी चिंता त्यांना वाटू लागली आहे. त्याच कारणाने लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काही आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा करून शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी खळबळ उडवून दिली आहे.

काय म्हणाले ? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख
“ज्यांचे शरद पवारांवर प्रेम नव्हते, ते सगळे जण कधीच निघून गेले आहेत. इकडे तिकडे बघणारे आणि दुसऱ्यांच्या घरात डोकावणारे बाहेर पडल्यानंतर आता आमच्या पक्षातून कोणीच जाणार नाही. मात्र, शरद पवारांची साथ सोडून गेलेले सुनील तटकरे सध्या ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या अजित पवार गटाचे बरेच आमदार लोकसभेच्या निकालानंतर भाजपसोबत जाण्याच्या तयारीला लागले आहेत,” असेही मेहबूब शेख यांनी म्हटले आहे. आपल्याला आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहजासहजी प्रवेश मिळणार नाही, हे लक्षात आल्याने स्वतः सुनील तटकरे हे सध्या गोंधळलेल्या स्थितीत असल्याचा टोला देखील शेख यांनी लगावला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button