जळगावच्या शासकीय रुग्णालयात दोनच दिवसात 15 अनोळखी मृतदेह दाखल !
जळगाव टुडे । जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठल्यानंतर दिवसा घरात बसणे देखील आता कठीण झाले आहे. अशा या परिस्थितीत दुपारच्या उन्हात बाहेर फिरणाऱ्यांना उष्माघाताचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात गेल्या दोन दिवसात तब्बल 15 अनोळखी मृतदेह दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्वांचा मृत्यू हा उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Breaking News)
दोन दिवसात जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 15 बेवारस मृतदेह दाखल झाले आहेत. सर्व मृतदेह 25 ते 65 वयोगटातील आहेत. अचानक मृत्यूची संख्या वाढल्याने शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत असून, शुक्रवारी 10 मृतदेह फ्रिजमध्ये तर पाच मृतदेह हे खाली जमिनीवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, चार ते पाच बेवारस मृतदेहांवर ओळख न पटल्याने अंत्यसंस्कार आटोपण्यात आले आहेत. गुरुवारी सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून ओळख न पटल्यास दोन दिवसात त्यांच्यावर देखील अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे शासकीय रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
उन्हात काम करणाऱ्या व बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना तीव्र उन्हाचा मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तींना जेवण तसेच पाणी वेळेवर न मिळाल्याने आधीच त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यातच उष्णतेच्या लाटांचा त्यांना सामना करावा लागत असल्याने जीव गमवावा लागतो. पोलिसांसमोर त्यांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यातच शवागारगृहात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. रुग्णालयातील नियमित मृत्यू, विविध घटनांमधील मृत्यू हे मृतदेह देखील याच ठिकाणी आणले जात आहेत. आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांत त्या व्यक्तींना काहींना काही आजार, प्रतिकारशक्ती कमी आहे, हे जरी दिसून येत असले तरी उष्णतेचा परिणाम झाल्याचे सांगितले जाते आहे. वाढती बेवारस मृतदेहांची संख्या लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.