मोठी बातमी…लोकसभा निकालानंतर लगेचच महाराष्ट्राची विधानसभा होईल बरखास्त ?
मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचालींना वेग
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या चार जून रोजी जाहीर होणार असला तरी या निवडणुकीत आपल्याला मोठे यश मिळेल, असा विश्वास राज्यातील विद्यमान महायुती सरकारला वाटत आहे. त्यामुळे लोकसभा निकालानंतर आठवडाभरातच महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करून लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचे भांडवल करण्यासाठी महायुती सज्ज झाल्याचे सांगितले जात आहे. मुदतपूर्व विधानसभा निवडणुका जाहीर करण्याच्या हालचालींना त्यामुळे वेग देण्यात आल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे. (Breaking News)
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदान पार पडले असून, आता फक्त निकालाची प्रतिक्षा आहे. निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली होती. आता कोण बाजी मारणार याची मतदार आतुरतेने वाट पाहत आहेत. दुसरीकडे मोदी सरकार विरोधात लाट असतानाही यंदा महायुतीला राज्यात 35 ते 38 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. लोकसभा निकालानंतर मोठा कालावधी उलटल्यावर राज्यातील वातावरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जेवढे काही यश मिळेल त्याचा उपयोग विधानसभेच्या निवडणुकीत करता येऊ शकतो, याचाच विचार महायुती त्यामुळे करू लागली आहे. त्यादृष्टीने विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करण्याच्या हालचाली गतीमान करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अजित पवार गटाच्या बैठकीने वेधले लक्ष
दरम्यान, महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे निवडणुकीचे वेध लागताच पक्षाच्या बैठकांचा सपाटा लावू शकतात. राष्ट्रवादी अजित पवार गटाची महत्त्वाची मिशन विधानसभा बैठक 27 तारखेला मुंबईत आयोजित केली आहे, यावरून त्याचा अंदाज येऊन देखील गेला आहे.