मोठी बातमी…उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र येणार ?

जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीसह महायुतीचे नेते तसेच उमेदवार, पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानताना दिसत आहेत. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे एकमेकांवर एका पातळीपर्यंतच आरोप करताना दिसून आले आहेत. एकूण चित्र लक्षात घेता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. एका पक्षाच्या मोठ्या नेत्यानेही त्यासंदर्भात खळबळजनक विधान केले आहे. (Breaking News)

“उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपासोबत समझोता केल्याचे बोलले जात आहे. तशात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचा प्रचार करत नाहीत, हे काँग्रेसच्या देखील लक्षात आले आहे. ठाकरेंच्या सेनेने एकप्रकारे काँग्रेसला फसवले आहे. काँग्रेसने देखील महाविकास आघाडीतील सेनेपासून फारकत घेतली आहे,” असे वक्तव्य करून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही सगळीकडे खळबळ उडवून दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपासोबत समझोता केला आहेच. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांमध्ये समझोता झाला असून, लोकसभा निवडणुकीनंतर दोघे एकत्र आले तर आश्चर्य मानू नका, असेही वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारार्थ उल्हासनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी आंबेडकर यांनी भाजपासह उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आणि उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्याविषयी भाष्य केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button