जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांना थांबविण्याचा भाजपचा मोठा डाव ?

जळगाव टुडे । लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील निवडणुकीत भाजपच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ यांना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील-पवार यांनी आव्हान दिले होते. प्रत्यक्षात बऱ्याच विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने स्मिता वाघ विजयी झाल्या. जळगाव शहर मतदारसंघाचाही त्यात मोठा वाटा होता. प्रत्यक्षात त्यानंतरही भाजपचे स्थानिक नेते जळगावच्या कामगिरीवर संतुष्ट नसून, त्याचे खापर आमदार राजूमामा भोळे यांच्या डोक्यावर फोडण्यात आले आहे. ( Jalgaon Politics )

Jalgaon Politics
भाजपच्या जळगावमधील उमेदवार स्मिता वाघ मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर विजयाचे श्रेय घेण्यासाठी महायुतीच्या बऱ्याच आमदारांमध्ये चढाओढ दिसून आली होती. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे हे देखील त्यात सहभागी होते. लोकसभेतील विजयानंतर आता आपल्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीचा आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असेही आमदार भोळे यांना वाटू लागले होते. तसा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर कालपर्यंत दिसतही होता. मात्र, अचानक जळगाव शहरातील भाजपच्या उमेदवारीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आणि आमदार भोळेंच्या चेहऱ्यावरील नूरच बदलला.

भोळेंना उमेदवारी मिळू न देण्याच्या हालचाली
विधानसभेच्या निवडणूक रिंगणातून ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन बाहेर पडल्यापासून जळगाव शहरावर भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून, राजूमामा भोळे यांना सलग दोन पंचवार्षिक जळगावची आमदारकी भूषविता आली आहे. दरम्यान, आताही आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी मिळेल, अशी आशा आमदार भोळे यांना लागली आहे. प्रत्यक्षात त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळू न देण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्याचे बोलले जात आहे. भाजप यावेळी जळगावमध्ये भाकरी फिरवणार असल्याच्या बातम्याही त्यासाठी पेरण्यात आल्याची चर्चा आहे.

आमदार भोळे करू शकतात मंत्रिपदावर दावा ?
सलग तिसऱ्यांदा भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर विजयी झाल्यास आमदार राजूमामा भोळे हे यावेळी मंत्रीपदाची अपेक्षा करू शकतात. नेमके हेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला नको असून, मंत्रीपदाची स्पर्धा वाढविण्यापेक्षा आमदार भोळे यांना आहे त्याच ठिकाणी थांबविण्याचा प्रयत्न त्यामुळे भाजपकडून केला जात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यादृष्टीने नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी भाजपकडून चाचपणी देखील सुरू झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button