BJP Maharashtra : भाजपच्या गोटात चिंता; विधानसभेत मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल निर्णायक…!

BJP Maharashtra : भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रभावी मुद्द्यांची चाचपणी सुरू केली असून, महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे दिसून येत आहे. याआधीच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी भाजपला स्वबळावर ४०० जागा मिळाल्यास संविधान बदल आणि आरक्षण संपविण्यात येणार असल्याचा प्रचार केला होता. ज्यामुळे महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता.

BJP Maharashtra : Anxiety in BJP fold; The issue of Maratha and OBC reservation in the assembly will be more effective…!

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव त्या दृष्टीने विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी चर्चा, चिंतन-मंथन करत आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत संविधान बदलाचा मुद्दा तेवढा प्रभावी राहणार नाही, असे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून समोर आले आहे. याउलट, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आता जनतेचे लक्ष केंद्रित असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरातील विविध आंदोलने आणि सामाजिक गटांच्या मागण्यांमुळे हे प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत. विशेषत: मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणाऱ्या गटांचा दबाव सरकारवर आहे. दुसरीकडे ओबीसी समाजातील काही घटकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे आणि यामुळे या दोन समुदायांमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने दोन्ही समाजांची मते सांभाळण्यासाठी रणनीती तयार करण्यावर भर दिला आहे.

धनगर समाजाच्या आरक्षण मागणीनेही राजकीय वातावरण तापवले

लोकसभा निवडणुकीत भाजपने उभे केलेल्या २८ जागांमध्ये एकूण १६८ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. मात्र, या मतदारसंघांपैकी केवळ ७८ मतदारसंघात भाजपला आघाडी मिळवता आली, ज्यामुळे पक्षाच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंता वाढली आहे. लोकसभेला भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर आंदोलने झाली होती, ज्याचा परिणाम मतदानावर दिसून आला. या आंदोलनामुळे भाजपला अनेक मतदारसंघांत समर्थन कमी झाले. आता मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आणि धनगर आरक्षणाच्या मुद्द्यांवरही चर्चा जोर धरत आहे. ओबीसी समाजातील काही घटकांनी मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शविला आहे, ज्यामुळे सामाजिक तणाव वाढला आहे. तसेच, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीनेही राजकीय वातावरण तापवले आहे. या तिन्ही गटांचे समाधान कसे करावे, असा प्रश्न भाजपसमोर उभा ठाकला आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button