भाजपाचे एक पाऊल पुढे…लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यासाठी मतदारांकडूनच मागविल्या सूचना

नागरिकांना पक्ष कार्यालयात 15 मार्चपर्यंत पाठविता येतील सूचना

BJP Jalgaon News : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संकल्प पत्रामध्ये ( जाहीरनामा ) कोणत्या मुद्द्यांच्या समावेश करावा तसेच विकसित भारत कसा असावा, यासाठी भाजपाने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत. येत्या 15 मार्चपर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना पक्ष कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी केले आहे.

9090902024  या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास पक्षातर्फे येणाऱ्या दूरध्वनीवर प्रत्यक्ष बोलूनही आपल्या सूचना कळविता येतील. पक्ष कार्यालयात नागरिकांच्या सूचना स्वीकारण्यासाठी सूचना पेटीदेखील ठेवण्यात आली असल्याचेही जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. सामान्य माणसाचा विकास हेच ध्येय ठेवून सुशासनाच्या उद्दिष्टाने राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीकडून आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारकडून काय अपेक्षा आहेत, हे कळावे तसेच यातील चांगल्या सूचनांचा संकल्पपत्रात समावेश करावा या हेतूने हे अभियान सुरु करण्यात आले आहे.  नमो ॲप,  ट्वीटर सारख्या  अशा विविध मार्गानेही  नागरिक भाजपाला सूचना करू शकतात, असेही श्री. जळकेकर महाराज यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संवादातून आलेल्या सूचनांचाही समावेश जाहीरनाम्यात होईल
राज्यातील या अभियानाचा प्रारंभ  भाजपा प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नुकताच झाला.  देशभरातून एक कोटी सूचना गोळा करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. भाजपाचा निवडणूक जाहिरनामा हे  विकसित भारताचे संकल्प पत्र असेल. पक्षाच्या जाहीरनाम्यात काय असावे यासाठी सामान्य माणसाचेही मत जाणून घेण्याचा हा अभिनव उपक्रम ”सब का साथ सब का विकास सब का विश्वास” या पंतप्रधान मोदीजींच्या संकल्पनेचाच भाग आहे. मोदी सरकारच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी ”विकसित भारत – मोदी की गारंटी रथ” ( व्हिडीओ व्हॅन ) सर्व लोकसभा मतदारसंघांत फिरणार असून त्याद्वारेही सामान्य नागरिकांना आपल्या सूचना भारतीय जनता पार्टीकडे कळविता येणार आहेत. या व्हिडीओ व्हॅनच्या माध्यमातून 250 ठिकाणी समाजातील वेगवेगळया घटकांशी संवाद साधला जाणार आहे. या संवादातून आलेल्या सूचनांचाही समावेश संकल्प पत्रामध्ये केला जाणार आहे, असेही भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. जळकेकर महाराज यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button