नवरदेवाच्या पुढे कोण नाचतोय ते पाहत बसू नका…जळगावमध्ये राजूमामा भोळेंनी कार्यकर्त्यांना का दिला असा सल्ला ?

सर्वांना व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन

BJP Jalgaon : “लग्न कार्याच्या धामधुमीत घोड्यावरील नवरदेवाच्या पुढे कोण कोण नाचत आहे, ते पाहत बसू नका…पंगतीत कोणाला काय कमी पडत आहे, त्याकडे लक्ष द्या”, असा सल्ला जळगाव शहरातील भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी आज येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. याशिवाय आळस झटकून सर्वांना व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.

जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानासमोर नव्याने आकारास आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात जळगाव शहर तसेच जळगाव ग्रामीण व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समिती सदस्यांची बैठक शनिवारी (ता. 09) दुपारी आयोजित करण्यात आली होती. त्यात मार्गदर्शन करताना आमदार श्री. भोळे बोलत होते. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदाचा बडेजाव न मिरवता सामान्य कार्यकर्त्यांचा आदर कसा राखला जाईल, त्याची काळजी घ्यावी. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने सर्वांनी ताबडतोब ॲक्शन मोडवर यावे, असेही आमदार राजूमामा भोळे यांनी नमूद केले.

यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा अमळनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख स्मिताताई वाघ, भाजपचे प्रदेश सचिव अजय भोळे, भाजप जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई बेंडाळे, जळगाव जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, जळगाव शहर विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. राधेश्याम चौधरी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गठीत भाजपच्या व्यवस्थापन समिती सदस्यांना त्यांच्या विविध जबाबदारींबाबत सविस्तर माहिती दिली. स्मिताताई वाघ, उज्ज्वलाताई बेंडाळे, ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनीही मार्गदर्शन केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.

भाजपच्या विकसित भारत प्रचार रथाला प्रारंभ
लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांनी भाजपच्या विकसित भारत प्रचार रथाला झेंडा दाखवला. सदर रथाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत विकसित भारत रथ जिल्ह्यात फिरणार आहे. दरम्यानच्या कालावधीत नागरिकांकडून संकल्प पत्र सुद्धा भरून घेतले जाणार आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button