गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांना जो झाला नाही, तो मशालवाल्यांना काय होणार ?
लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी यांची माजी खासदारांवर टीका
BJP Jalgaon : “विहिरीतल्या बेडकाला जसा सिंहापेक्षा मोठा झाल्याचा भ्रम होतो, तसाच काहीसा भ्रम जळगावच्या माजी खासदाराला आता झाला आहे. सध्या चिंधी सापडलेल्या उंदरासारखी अवस्था झालेल्या या महाशयाने भाजपमध्ये असताना काही दिवे लावले नाही आणि पक्ष सोडल्यावर ज्यांनी मोठे केले त्यांच्यावरच ते उलटले आहेत. भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यांना जो झाला नाही तो मशालवाल्यांना काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित करून लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी यांनी उन्मेश पाटलांवर आज येथे जोरदार टीका केली.
जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्याबद्दल शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत बेताल वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी (ता.11) दुपारी डॉ.राधेश्याम चौधरी यांनीही त्यांच्यावर शरसंधान साधले. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा प्रभारी अरविंद देशमुख, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, महानगर जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अश्विन सोनवणे व सुनील खडके, सरचिटणीस अमित भाटीया आणि महेश जोशी, डॉ. क्षितीज भालेराव, प्रकाश बालाणी, भूषण भोळे, राहूल पाटील, महानगरचे प्रसिद्धी प्रमुख मुविकोराज कोल्हे, जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
भस्मासुरी प्रवृत्तीला जनता लोकसभा निवडणुकीत नक्कीच धडा शिकवणार
“पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली नाही म्हणून लगेच दुसऱ्या पक्षात उडी घेणाऱ्या माजी खासदाराला सध्या शेतकऱ्यांविषयी खूपच कळवळा दाटून आला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर महिन्यातच जर जिल्हा बँक चुकली होती तर तेव्हाच खासदारांनी आवाज का उठविला नाही, गटसचिवांना न्याय का मिळवून दिला नाही,” असे प्रश्न डॉ.राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केले. याशिवाय “शेतकऱ्यांविषयीचे त्यांचे सध्याचे प्रेम हे बेगडी प्रेम असून, गिरणेवरील बलून बंधाऱ्यांना पर्यावरणाची मान्यता दिली नाही म्हणून शिवसेनेच्या नेत्यांवर त्यावेळी टीका करणारे आज त्यांना साहेबाची उपमा देत आहेत. जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्नही सध्या त्यांच्याकडून सुरू आहे. आतापर्यंत ठेकेदारांच्या गळ्यातील तावीज असलेले खासदार आज अचानक शेतकऱ्यांचे कैवारी बनले आहेत. विकास सोसायट्यांच्या गट सचिवांवर ते सध्या दाखवत असलेले प्रेम देखील पुतना मावशीचे प्रेम आहे. कोणत्याही प्रकारची श्रद्धा आणि सबुरी नसलेली ही राजकीय भस्मासुरी प्रवृत्ती असून, जनता खूप हुशार आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर आरोप करणाऱ्या माजी खासदाराचा संधीसाधूपणा तसेच कृतघ्न स्वभाव उघड झाला आहे. त्यांच्याकडे पाहुन सरड्यालाही आत्महत्या करावी वाटेल, अशा रंग बदलणाऱ्या वृत्तीचा आम्ही निषेध करतो,” असेही डॉ.राधेश्याम चौधरी यांनी बोलून दाखवले.