सासऱ्यांशी पटत नसतानाही रक्षा खडसे यांना जामनेरमधून देणार सर्वाधिक मताधिक्य- गिरीशभाऊ महाजन

BJP Jalgaon : “ज्या पक्षाने तुमच्या घरात आतापर्यंत सर्व पदे आणि 15 वर्षे लाल दिव्याची गाडी दिली त्या भारतीय जनता पक्षाला कोणी कुत्रं विचारत नव्हतं, असे म्हणणे मुक्ताईनगरच्या माजी नेत्याला शोभत नाही. आमच्या मनात कोणताच दुजाभाव नाही. रक्षा खडसे चांगले काम करतात म्हणून त्यांना पक्षाने तिकीट दिले. त्यांच्या सासऱ्यात आणि माझ्यात कितीही टोकाचे संबंध असले तरी रक्षा खडसेंना जामनेरमधून सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी आम्ही घेतो,” असे प्रतिपादन भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी येथे केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा पश्चिम व पूर्व विभाग तसेच जळगाव महानगरचे आमदार, खासदार, प्रदेश व जिल्हा कार्यकारीणीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (ता.19) दुपारी ब्राम्हण सभेच्या सभागृहात पार पडली. त्यात मार्गदर्शन करताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश प्रभारी रवी अनासपुरे, प्रदेश सचिव अजय भोळे, भाजपचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार महाजन, किशोर काळकर, मधुकर काटे, राकेश पाटील, महेश जोशी, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील तसेच लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे आणि स्मिताताई वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.चौधरी यांनी केले.

जळगावची पहिली महिला खासदार होण्याचा मिळावा मान : स्मिताताई वाघ
अमळनेर तालुक्यातील डांगर बुद्रुक सारख्या लहान गावाची रहिवासी असताना, मला भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेचे तीनवेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेची पहिली महिला अध्यक्ष केले. तेवढ्यावरच न थांबता विधान परिषदेत आमदार बनविले. भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर जळगावची पहिली महिला खासदार होण्याचा मान आता मला मतदारांनी मिळवून द्यावा, अशी अपेक्षा जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केली.

10 वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांना सामोरे जाणार : रक्षा खडसे
भारतीय जनता पार्टीकडून यापूर्वी दोनवेळा लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यात केळीचे प्रश्न होते, रेल्वेच्या समस्या होत्या, बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गाचा पाठपुरावा होता. गेल्या 10 वर्षात काही चुका झाल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करते. चांगल्या विकासकामांच्या जोरावरच आता मतदारांना सामोरे जाणार आहे, असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी केले.

मेळाव्याच्या ठिकाणी आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, भाजपचे प्रदेश पदाधिकारी विजय चौधरी, रवी अनासपुरे तसेच उज्ज्वलाताई बेंडाळे, अमोल जावळे यांचीही भाषणे झाली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थितांना मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. लोकसभेच्या दोन्ही जागा प्रत्येकी 05 लाखांवर मतांनी विजयी करण्याचे आवाहन देखील केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button