“भाजपला कधी कुत्रं विचारत नव्हतं…., खरं म्हणजे आज एकनाथ खडसेंची अवस्था तशी झाली आहे”
भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांचे प्रत्युत्तर
BJP Jalgaon : “भाजपला कधी कुत्रं विचारत नव्हतं तेव्हा आपण पक्षासाठी एकटे लढलो, सर्वांशी संघर्ष केला आणि आजही करतोय, कधी खचलो नाही, कधी पळालो नाही, विकला गेलो नाही, छळ झाला सगळं झालं,” असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी नुकतेच प्रसिद्धी माध्यमांसमोर केले. त्या वक्तव्यानंतर भाजपाचे जळगाव जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी “खरं म्हणजे तुमचीच अवस्था आज तुम्ही बोललेल्या वाक्याप्रमाणे झालेली दिसते. “, अशा शब्दात एकनाथ खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“महाराष्ट्राचे स्वयंघोषित नेते आणि बेताल वक्तव्य करण्यासाठी सध्या प्रसिद्ध असलेले नेते एकनाथ खडसे यांना मी सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी तुमची मातृसंस्था झाली, ती तुमची माता झाली. भारतीय जनता पक्षानेच तुम्हाला आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते बहाल केले. यासोबतच विविध 12 खात्यांची मंत्रिपदे दिली. तुमच्या मुलीला जळगाव जिल्हा बँकेची चेअरमन केले. तुमच्या पत्नीला जळगाव दूध संघ आणि महानंदचे चेअरमनपद दिले. एवढे सगळे तुम्हाला भारतीय जनता पार्टीने दिले. त्यानंतरही तुम्ही त्या पक्षाच्या बाबतीत म्हणता की त्याला कुत्रं विचारत नव्हते. खरे म्हणजे आम्हाला तसे म्हणावेसे वाटत आहे कारण की तुमची अवस्था आज तुम्ही बोललेल्या वाक्याप्रमाणे झालेली दिसते. वयाचे भान ठेवून यापुढे वक्तव्ये करावी, भारतीय जनता पार्टी होती म्हणून आपण उगमाला आलाो त्याचे तरी भान ठेवावे,” असेही भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी म्हटले आहे.