सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध विजयी, नेमके कोण आहेत हे दलाल ?

BJP : लोकसभेच्या सुरत मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आणि अन्य आठ जणांनी माघार घेतल्याने भारतीय जनता पार्टीचे मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले. भाजपाने त्यांच्या माध्यमातून विजयाचा पोळा फोडला असून, काँग्रेसला त्याठिकाणी मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जात प्रस्तावकांच्या बनावट सह्या झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

“मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचा आभारी आहे. मी लोकशाही पद्धतीने जिंकलो आहे. मी माझ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचाही मनापासून आभारी आहे. विरोधकांबद्दल मी एवढेच सांगेन की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडतात तेव्हा त्यांना बरे वाटते. जेव्हा त्यांच्या अपेक्षेविरुद्ध गोष्टी होतात तेव्हा ते लोकशाहीची हत्या म्हणून पाहू लागतात”, अशी प्रतिक्रिया बिनविरोध निवड झाल्यानंतर मुकेश दलाल यांनी प्रसार माध्यमांसमोर दिली.

पहिल्यांदाच उमेदवारी, बिनविरोध विजयी

भाजपाकडून मुकेश दलाल यांना पहिल्यांदाच सुरतमधून उमेदवारी मिळाली होती. या जागेवर भाजपच्या दर्शना जरदोश गेल्या तीन पंचवार्षिकपासून विजयी होत आल्या होत्या. मात्र, यावेळी दर्शना यांचे तिकीट रद्द करून मुकेश दलाल यांना उभे करण्यात आले होते. दलाल हे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते गेल्या 43 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्य करत असून, सलग तीन वेळा नगरसेवक देखील राहिले आहेत. याशिवाय भाजप युवा मोर्चातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर आतापर्यंत काम केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button