रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनीही भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश
BJP : सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणारे जळगाव जिल्ह्यातील रावेर येथील उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांनी बुधवारी (ता. 14) भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला चांगलाच हादरा दिला होता. त्यानंतर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीचे रहिवाशी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय गरूड यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येय, धोरणांवर विश्वास ठेवून जाहीर पक्ष प्रवेश केला होता. काही दिवस उलटत नाही तेवढ्यात आता रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी भाजपचा हात हातात धरला आहे. लोकसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद त्यामुळे चांगलीच वाढली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्येही नवा उत्साह संचारला आहे.