Bhusawal News : भुसावळ शहरातील द्वारकाई व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प हिंगोलीचे कवी गणेश आघाव गुंफणार !
जय गणेश फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
Bhusawal News : भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यंदा या सांस्कृतिक उपक्रमाचे दहावे वर्ष आहे. एक दिवसाआड म्हणजेच २७, २९ आणि ३१ जुलै, असा तीन दिवस हा वैचारीक उपक्रम विविध ठिकाणच्या तीन शाळांमध्ये आयोजित केला आहे. दरम्यान, व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प हिंगोलीचे कवी गणेश आघाव हे गुंफणार आहेत.
Bhusawal News : Poet Ganesh Aghav of Hingoli will tie the first flower of Dwarkai lecture series in Bhusawal city!
यंदाच्या व्याख्यानमालेची सुरूवात शनिवारी (ता. २७ जुलै) कुऱ्हे पानाचे येथील रा. धो. माध्यमिक विद्यालयात सकाळी ९.३० वाजता होईल. हिंगोली जिल्ह्यातील सावळी खुर्द येथील कवी गणेश आघाव हे प्रथम पुष्प गुंफतील. ‘चला कवितेतून पेरू या जाणिवांचे बीज’ हा त्यांचा विषय असेल. द्वितीय पुष्प सोमवारी, २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भुसावळातील रामदास गणपत झांबरे विद्यालयात जळगाव येथील साहित्यिक डॉ. मिलिंद बागूल हे गुंफतील. ‘शालेय शिक्षण, जीवन आणि मैत्रीभाव’ हा त्यांचा विषय असेल. तृतीय पुष्प बुधवारी, ३१ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता अहिल्यादेवी कन्या विद्यालयात अमळनेर येथील साहित्यिक रमेश पवार हे गुंफणार आहेत. ‘लेकरांनो, बापाला मिठून मारून घ्या रे’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे.
जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्याख्यानमाला आयोजन समितीची बैठक सुरभी नगरातील कार्यालयात घेण्यात आली. त्यात ही माहिती देण्यात आली. समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यात फाउंडेशनचे मार्गदर्शक स्वर्गीय अरुण मांडाळकर यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
यंदाच्या व्याख्यानमालेत हिंगोली, जळगाव, अमळनेरच्या वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी….
प्रथम पुष्प : गणेश आघाव हे गुंफणार आहेत. त्यांच्या ‘पोरी शाळेत निघाल्या’ कवितेचा सोळा भाषांत अनुवाद प्रकाशित. बालभारती किशोर मासिकात कविता प्रकाशित आहेत. कणसांच्या कविता, मातीला फुटले हात, आघाववाडीची गाणी, बारभाई काव्यसंग्रह प्रकाशित. बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, पूरक वाचन समिती (पुणे) सदस्य.
द्वितीय पुष्प : डॉ. मिलिंद बागूल गुंफतील. ते जळगाव तालुक्यातील असोदा येथील सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष आहेत. ‘संदर्भ माझ्या जातीचे’, ‘तेवढेच संदर्भ आमचे’ ‘कथाशील’, ‘हमालपुरा ते कुलगुरू’ अशी साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. कर्नाटक विद्यापीठात त्यांचे साहित्य अभ्यासले जातेय.
तृतीय पुष्प : रमेश पवार हे गुंफणार आहेत. ते सेवानिवृत्त पोस्टमास्तर, कवी, कथा, ललित लेखनात हातखंडा आहे. ‘एक माळरान’, ‘गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ’ काव्यसंग्रह, ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं’ बालनाट्य लेखन. जळगाव आकाशवाणी केंद्रावर विविध कार्यक्रमात ते सहभागी झाले. विविध दिवाळी अंकात साहित्य प्रकाशित झाले आहे.