कोट्यवधींचे नुकसान…बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात चक्रीवादळाने केळीच्या बागा उद्धवस्त !
जळगाव टुडे । सातपुडा पर्वताच्या पायथ्यालगत वसलेल्या बऱ्हाणपूर, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात वाढत्या तापमानामुळे हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा आधी होरपळल्या होत्या. त्यातभर शनिवारी (ता.25) सायंकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे होत्या नव्हत्या त्या सर्व बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज देखील वर्तविला जात आहे. (Banana Damage)
गेल्या काही दिवसांपासून विशेषतः जळगाव जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा हा 45 अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. यामुळे मोठ्या कष्टाने वाढवलेल्या केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या असून, संबंधित सर्व शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत. ही सर्व स्थिती लक्षात घेता केळी उत्पादकांना तातडीने हवामानावर आधारीत फळ पिकविम्याची भरपाई द्यावी, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. तशात आता पुन्हा चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी देखील केली आहे.
नशिबापुढे कोणाचेच चालले नाही…
दरम्यान, तापमान वाढीचे संकट समोर उभे ठाकलेले असतानाच शनिवारच्या चक्री वादळाने क्षणार्धात केळीच्या घडांनी लगडलेल्या बागा जमिनदोस्त झाल्या आहेत. संबंधित सर्व केळी उत्पादकांचा हातातोंडाशी आलेला घास त्यामुळे हिरावला गेला आहे. कधीही भरून न निघणारे नुकसान पाहुन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तोंड द्याव्या लागणाऱ्या अस्मानी संकटांचा सामना करताना नाकीनऊ आल्यानंतर यंदा तरी मागचे सर्व नुकसान भरून निघेल, या आशेवर शेतकऱ्यांनी जीवापाड केळीच्या बागा जगविल्या होत्या. परंतु, नशिबापुढे कोणाचेच काही चालले नाही.