विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यास दाखल होणार गुन्हा

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची अटी व शर्तीसह मान्यता घेणे बंधनकारक

Bailgada Sharyat : जळगाव जिल्ह्यात बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अटी व शर्तीसह मान्यता देण्यात येणार आहे. विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करू नये. तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित घटनापीठाने प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 2017 मधील तरतुदी आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडा शर्यतीचे आयोजन) नियम 2017 मध्ये विहित करण्यात आलेल्या नियम व अटी/शर्तींचे काटेकोर पालन करून राज्यात बैलगाडी शर्यतीचे आयोजनास परवानगी दिलेली आहे. यास अनुसरून अटी/शर्तींचे काटेकोर पालन करून राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करावे. संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशा प्रसंगीच बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यात येईल. राज्यात बैलगाडा शर्यत, शंकरपट, छकडी अश्या 100 मीटरपेक्षा कमी अंतर असलेल्या शर्यतीस परवानगी आहे. बैलगाडा शर्यत आयोजित करू इच्छिणाऱ्या आयोजकांनी विहित नमुन्यात बँक हमी किंवा मुदत ठेव पावतीच्या स्वरुपात रु. 50 हजार इतक्या प्रतिभूती ठेवीसह जिल्हाधिकारी यांच्याकडे किमान 15 दिवस आधी अर्ज करावा. बैलगाडा शर्यत आयोजनाच्या संपूर्ण कालावधीत उपस्थित राहण्यासाठी नायब तहसीलदार व पोलीस उप-निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या दोन अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून प्राधिकृत करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित शर्यतीचे आयोजन थांबविण्यास सदर निरीक्षक प्राधिकृत असतील. बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेणाऱ्या सहभागी होणाऱ्यांनी शर्यतीच्या अगोदर बैल/वळू यांची नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकामार्फत तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. शर्यत आयोजनाचे चित्रीकरण डिजिटल स्वरुपात करण्यात येईल.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button