बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांची जानेवारी महिन्यात धरणगाव तालुक्यात होणार कथा !
जळगाव टुडे । जगप्रसिद्ध बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आणि कथाकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेचे आयोजन जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा (ता.धरणगाव) येथे जानेवारी २०२५ मध्ये करण्यात आले आहे. सुमारे ५० ते ६० एकरावरील मंडपात सदर कथा कार्यक्रम प्रस्तावित असून, त्याबाबतची माहिती कथा समितीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक संदीप पाटील यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. ( Bageshwar Dham )
साधारणपणे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील तीन दिवस बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम होईल. सुमारे ५० ते ६० एकरावरील मंडपात कथा श्रवणासाठी आलेल्या भाविकांच्या बैठकीची व्यवस्था केली जाणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनाने आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पथराड, सोनवद, विहीर फाटा चौफुलीवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यादृष्टीने आयोजन समितीतर्फे आतापासूनच नियोजन केले जात आहे.
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाट्यावर देखील काही महिन्यांपूर्वी पंडित प्रदीप मिश्रा यांची सात दिवसीय शिवकथा आयोजित केली होती. त्याठिकाणी झालेली लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता झुरखेडा येथेही बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथा कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण, पंडित प्रदीप मिश्रा यांच्या इतकीच बागेश्वर बाबांची देश व विदेशात महती असल्याचे सांगितले जाते. धीरेंद्र शास्त्री यांच्या कथा कार्यक्रमाचे नियोजन झुरखेडा व निमखेडा परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्याने सुरू आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर कथा कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. झुरखेडा हे गाव पाळधी ते सोनवद रस्त्यावर वसलेले आहे.