बच्चू कडू संतापले; मंत्री गिरीश महाजन यांनी थेट अध्यक्षांकडे मागितले संरक्षण…!
जळगाव टुडे । ग्रामपंचायतींच्या ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या १९ महिन्यांपासून थकीत वेतन मिळालेले नाही. याप्रकरणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात जाब विचारत आमदार बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच धारेवर धरले. बच्चू कडू यांनी कोंडीत पकडल्यानंतर प्रसंगी मंत्री महाजन यांनी थेट अध्यक्षांकडे संरक्षण देण्याची मागणी केली. ( Vidhansabha Session )
Vidhansabha Session
विधानसभेच्या अधिवेशनात बच्चू कडू यांनी ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्र शासन शहरातील नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना तसेच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांना नियमित पगार करते. त्यांना कर वसुलीची कोणतीच अट नसते. मग ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर का अन्याय केला जातो, तुम्ही शहरी व ग्रामीण असा फरक कशासाठी करता, असे बरेच प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना असते वसुलीची अट
शहरातील नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांचे नियमित पगार केले जातात. त्यांना घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची अट लावली जात नाही. मग ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनाच पगार करण्यासाठी वसुलीची अट का लावली जाते, असा सवाल बच्चू कडू यांनी केला. तेव्हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी शासनाने एक समिती नेमल्याचे उत्तर मंत्री महाजन यांनी दिली. मंत्री महाजनांच्या वक्तव्यावरून बच्चू कडू त्यामुळे चांगलेच संतापले. दरम्यान, मंत्री महाजन बोलत असताना बच्चू कडू त्यांच्या प्रत्येक शब्दाचे मध्येच खंडन करत होते. त्यामुळे गिरीश महाजन यांनी थेट अध्यक्षांकडे संरक्षणाची मागणी केली. सभागृह सुद्धा त्यामुळे क्षणभर अवाक झाले.