आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला मोठा धोका…पोलिसांकडून वाय प्लस सुरक्षा !
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनीच त्यासाठी सुपारी घेतल्याचा खळबळजनक आरोप आमदार रवी राणा यांनी नुकताच केला होता. दरम्यान, बच्चू कडू यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र अमरावतीच्या पोलिस अधीक्षकांना आता दिले आहे. त्यामुळे पोलिसांनी आमदार कडू यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देखील दिली आहे. दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीने अमरावती जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. ( Bacchu Kadu )
आमदार बच्चू कडू यांना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निनावी फोन येत आहेत. भाऊ तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न फोनवरुन अज्ञातांकडून विचारले जात आहेत. त्यामुळे वैतागलेल्या कडू यांनी फोन करणाऱ्यांनाच एकदिवस जाब विचारला. त्यानंतर मात्र जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात सर्व प्रकार सांगितला आहे.
गोपनीय माहितीनुसार माझ्या जीवाला धोका असल्याची माहिती देखील आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे दिली आहे. माझा अपघात झाल्याची अफवा मुद्दाम पसरवली जात असल्याचेही बच्चू कडू यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी सुद्धा त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
“मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि मी गडचिरोलीत राहतो…माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत…बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार…नाही तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार…बच्चू कडू म्हणजे काहीच नाही बच्चू कडूला पाहून घेऊ…”, अशा धमक्या आपल्याला येत असल्याचे बच्चू कडू यांनी अमरावतीच्या पोलिस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.