‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटविण्याचा प्रयत्न !
Jalgaon Today : मराठा आरक्षणाचा विषय वेळीच मार्गी न लावल्याच्या कारणावरून राज्यातील भाजपसह महायुतीच्या बऱ्याच लोकसभा उमेदवारांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनाही मराठा आंदोलकांनी पिटाळून लावल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर आज मंगळवारी (ता.07) सांगोला तालुक्यातील बादलवाडीच्या मतदान केंद्रावर ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत ईव्हीएम मशीन पेटविण्याचा प्रयत्न एका मतदाराकडून झाला.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या आंदोलकांच्या तीव्र रोषाचा सर्वाधिक फटका भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे तसेच पंकजा मुंडे, अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण, प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांना यापूर्वीच बसला आहे. संबंधितांचा ताफा अडवून त्यांच्यासमोर ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा बाजी देखील करण्यात आली आहे. तेवढ्यावरच न थांबता मराठा आंदोलकांनी आता ईव्हीएम मशिनवर आपला संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड तसेच बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, धाराशिव, लातूर या मतदारसंघातही आज लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सांगोल्यातील बादलवाडी येथील मतदान केंद्रावर एका व्यक्तीने ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला. टीव्ही9 मराठीने त्यांसंदर्भातील वृत्त दिले असून, ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणा देत मशीन जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपविले आहे.
Attempt to set fire to EVM machines