अशोक चव्हाणांचा देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. 13) मुंबईतील प्रदेश कार्यालयात जाऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. चव्हाण यांच्यासोबत त्यांचे सहकारी अमर राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.
आजपासून आपल्या आयुष्याची खऱ्या अर्थाने नवी सुरुवात झाली आहे आणि मी एक नवी सुरुवात करत आहे. यापुढे मी भाजपच्या ध्येय धोरणांनुसार काम करेल. विशेषतः पक्षाचा आदेश व फडणवीस यांचे निर्देश यांच्यानुसार मी वाटचाल करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करेल. आज माझ्या 38 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत बदल झाला. मी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. यापुढे मी मोदींची स्फूर्ती व प्रेरणा घेऊन काम करेल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नमूद केले. याशिवाय अशोक चव्हाण म्हणाले की, विरोधी पक्षात असतानाही आमच्या मतदारसंघाला न्याय देण्यासाठी फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. मी जिथे राहिलो तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. भाजपमध्येही प्रामाणिकपणे काम करणार आहे. राज्यात भाजपला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा प्रयत्न करणार आहे. माझा अनुभव पणाला लावेल. राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधात बोलत आहेत. काही समर्थन करत आहेत. पण मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही.