१०० कोटींची खंडणी….शरद पवार, उद्धव ठाकरेंना अडकविण्याचा देवेंद्र फडणवीसांचा होता डाव !
जळगावमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे वक्तव्य
जळगाव टुडे । महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामाही द्यावा देखील लागला होता. याशिवाय तब्बल १४ महिने तुरूंगातही काढावी लागली होती. अर्थात, नंतर त्यांना उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना त्या प्रकरणात अडकविण्याचा मोठा डाव देवेंद्र फडणवीस यांनी रचला होता, असे खळबळजनक वक्तव्य खुद्द माजी मंत्री श्री.देशमुख यांनी आता केले आहे.
Anil Deshmukh
जळगावमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष निवडीच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी पक्षाचा समन्वयक म्हणून माजी मंत्री अनिल देशमुख यांनी हजेरी लावली. प्रसंगी त्यांनी महायुतीच्या सरकारवर आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. १०० कोटींचे खंडणी प्रकरण कसे बनावट होते आणि त्यात आपल्याला अडकविण्यासाठी मुंबईचे तत्कालिन पोलिस आयुक्त परमजित सिंग यांचा कसा वापर करण्यात आला, त्याविषयीचा विस्तृत घटनाक्रमच त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना उलगडला.
Anil Deshmukh
“प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घरासमोर स्फोटके भरलेली कार सापडल्यानंतर, आपण तत्कालिन पोलिस आयुक्त परमजित सिंग यास तातडीने निलंबित केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रकरणात मला अडकविण्यासाठी परमजित सिंगला पकडले. आपल्याकडून गृहमंत्र्यांनी १०० कोटींची खंडणी मागितली म्हणून खोटी तक्रार करण्यास सांगितले. प्रत्यक्षात, न्यायालयात साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा परमजित सिंग विदेशात पळून गेला. अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपाचे माझ्याजवळ पुरावे नसल्याचे त्याने वकिलामार्फत लिहून पाठवले,” असेही माजी मंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केले.
Anil Deshmukh
दरम्यान, “देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे काही माणसे एक पाकीट घेऊन पाठवली होती. शरद पवारांसह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर आम्ही सांगतो तसे आरोप लावा; त्यानंतर तुम्ही सहीसलामत सुटाल, असे त्यात म्हटले होते. पण मी त्यांना सांगितले की, आयुष्यभर तुरूंगात राहील पण कोणापुढे झुकणार नाही,” असाही गौप्यस्फोट माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जळगावमध्ये केला. यावेळी शरद पवार माझ्या पाठीशी संकटात खंबीरपणे उभे राहिल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला.