अमित शहांची जळगावच्या सभेत सोनिया गांधींसह शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या अपत्य प्रेमावर टीका
2047 चा विकसित भारत घडविण्यासाठी तरूणाईला मतदानाची साद
Amit Shaha : घराणेशाही चालविण्यासाठी काँग्रेसच्या सोनिया गांधी त्यांचा मुलगा राहुल तसेच राष्ट्रवादीचे शरद पवार त्यांची मुलगी सुप्रिया आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्यला राजकारणात लाँच केले आहे. सोनिया गांधींनी तर राहुल गांधींना आतापर्यंत 19 वेळा लाँच केले आहे. मात्र, त्यांचा मुलगा अजुनही पंतप्रधान होऊ शकलेला नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केली.
भाजपा युवा मोर्चातर्फे जळगाव शहरातील सागर पार्कवर मंगळवारी (ता. 05) दुपारी भव्य युवा संवाद संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात युवकांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री श्री. शहा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, खासदार डॉ. हिना गावित, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, आमदार जयकुमार रावल, आमदार काशिराम पावरा, आमदार राजेंद्र गावित, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री विजय चौधरी, उपाध्यक्ष स्मिता वाघ, प्रदेश सचिव अजय भोळे, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई बेंडाळे, युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार महाजन आदी उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री श्री.महाजन आणि श्री. बावनकुळे यांचीही भाषणे झाली.
अमित शहांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने भाषणाची सुरूवात
जळगावमधील युवा संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम वंदन करून जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा देत आपल्या भाषणाची सुरूवात केली. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम देशाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली होती. त्यामुळेच आज आपला देश स्वाभिमानाच्या आणि स्वावलंबनाच्या मार्गावरून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे, असे गौरवोद्गार देखील केंद्रीय मंत्री श्री. शहा यांनी काढले. 2047 चा विकसित भारत घडवायचा असेल तर लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी तरूणाईला केले.