Amalner Taluka : मंत्री अनिल पाटलांकडून जुन्या दोस्तीचा वास्ता; साहेबराव पाटील सोडणार का शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा रस्ता ?

Amalner Taluka : वर्षभरापासून दूर राहिलेले अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यास हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील झाले गेले विसरून साहेबराव पाटलांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन आले होते . त्यामुळे अमळनेर तालुक्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलण्याचे संकेत मिळत असतानाच, सोमवारी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी साहेबराव पाटलांची भेट घेऊ जुन्या दोस्तीचा वास्ता दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Amalner Taluka: Minister Anil Patal rekindles old friendship; Will Sahebrao Patil again leave the path of Sharad Pawar NCP?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यावर अजित पवार आणि शरदचंद्र पवार हे दोन गट अस्तित्वात आल्यानंतर अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे वैयक्तिक शरद पवार गटापासून लांब गेले होते. मात्र, वर्षभराच्या दुराव्यानंतर अचानक त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगावमधील २१ जुलै २०२४ रोजी पार पडलेल्या मेळाव्याला हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा जोरदार धक्का दिला. “साहेबराव पाटील हे आपल्यातलेच आहेत. अमळनेरची विधानसभा निवडून आणण्यासाठी ते पूर्ण ताकद पणाला लावतील. तुम्ही काही चिंता करू नका. त्यांची आणि माझी मैत्री फार वर्षांची आहे, साहेबराव पाटील नक्की योग्य ते काम करतील,” असे विधान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जळगावच्या त्या मेळाव्यात केले होते.

अमळनेरच्या उमेदवारीसाठी साहेबराव पाटील होते सर्वात पुढे…

दरम्यान, जळगाव येथे पार पडलेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती देखील घेतल्या होत्या. अर्थातच, अमळनेरसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये माजी आमदार साहेबराव पाटील हे सर्वांच्या पुढे होते. मात्र, अमळनेरसाठी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील तसेच तिलोत्तमा पाटील व गिरीश निकम यांनीही लढण्याची इच्छा प्रदेशाध्यक्षांसमोर व्यक्त केली. इच्छुकांची एकूण स्पर्धा लक्षात घेता राष्ट्रवादीकडून आपल्याला काही सहजासहजी उमेदवारी मिळणार नाही, याचा अंदाज साहेबराव पाटलांना त्यामुळे आल्याशिवाय राहिला नाही. परिणामी, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीशी जाहीर मनोमिलन झाल्यानंतरही माजी आमदार साहेबराव पाटील हे थोडे निराशच होते.

मंत्री अनिल पाटलांचा गरम लोखंडावर घाव…

मेळाव्यात सहभागी झाल्यानंतरही अमळनेरच्या उमेदवारीसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही म्हटल्यावर, साहेबराव पाटील हे थोडे हताश झाले होते. हीच संधी साधून गरम लोखंडावर घाव घालण्यासाठी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील थेट राजवडला पोहोचले. निमित्त साहेबराव पाटलांच्या पत्नी व अमळनेरच्या माजी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांच्या तब्बेतीची विचारपूस होते. दरम्यान, अमळनेरचे दोन्ही मातब्बर दादा एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली.

साहेबराव पाटलांकडून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीला क्रांती दिनाची ‘डेड लाईन’

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या असल्या तरी थेट उमेदवारी अद्याप कोणाचीच जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळते की अन्य दुसऱ्याला, असा प्रश्न संबंधित सर्व इच्छुकांना पडला आहे. त्यात अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील हे देखील आहेत. राष्ट्रवादीने ऐनवेळी आपला विचार केला नाही तर पुढे करावे काय, या विचारात असलेल्या साहेबराव पाटलांची भेट घेऊन मंत्री अनिल पाटील यांनी बरोबर वेळ साधली आहे. तर प्रसार माध्यमांशी बोलताना साहेबराव पाटलांनी त्यांच्या मंत्र्यांच्या भेटीत कोणतीच राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. मात्र, येत्या क्रांती दिनी (ता.९ ऑगस्ट) आपण पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहोत, अशी गुगली टाकण्यासही ते विसरलेले नाहीत. एक प्रकारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अमळनेरच्या विधानसभा उमेदवारीची डेड लाईन त्यांनी दिली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button